Ad will apear here
Next
वैभवशाली फ्लोरा फाउंटनचा स्थापत्य इतिहास आणि कलासौंदर्य
पुनरुज्जीवित फ्लोरा फाउंटन

ब्रिटिशकालीन मुंबईत उभारल्या गेलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण इमारतींपैकीच एक म्हणजे फ्लोरा फाउंटन. १८६९मध्ये सुरू झालेले हे कारंजे अलीकडे काही काळ बंद होते. यंदाच ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी या फ्लोरा फाउंटनचा स्थापत्य इतिहास आणि कलासौंदर्य या दृष्टीने घेतलेला हा आढावा... 
............
सर बार्टल फ्रियरइसवी सन १६८६ -१७४३च्या दरम्यान पोर्तुगीजांनी बांधलेली तत्कालीन फोर्टमधील वसाहत उंच तटबंदीने घेरलेली होती. चहूबाजूंनी तटबंदीने घेरलेल्या फोर्ट परिसरात खासगी वापरासाठी व व्यावसायिक कार्यालयांसाठी जागा कमी पडू लागली; मात्र विस्तार करणे शक्य नव्हते. सन १८५८मध्ये भारतात ब्रिटिश राजवट सुरू झाली. सन १८६२मध्ये ब्रिटिश सरकारने सर बार्टल फ्रियर या महत्त्वाकांक्षी व दूरदर्शी वसाहतकालीन प्रशासकाची मुंबईचा गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली. गव्हर्नर फ्रियरने परिस्थितीचा अंदाज घेऊन तटबंदी पाडून परिसर विस्तार योजना आखली व ती कार्यान्वित करण्याचे धाडसही केले. गव्हर्नर फ्रियर १८६२ ते १८६७पर्यंत पदावर राहिला. या पाच वर्षांच्या कारकिर्दीत भविष्याचा अचूक वेध घेऊन त्याने सार्वजनिक व प्रशासकीय इमारतींसोबत टाउन हॉल, सिनेमा, नाट्यगृहे, वाहतूक बेट, उद्याने, खुली मैदाने, फाउंटन/पाणपोई अशा इमारती बांधल्या. या करारी गव्हर्नरने घेतलेल्या धाडसी निर्णयामुळेच आधुनिक मुंबईच्या विस्ताराचा पाया घातला गेला. सन १८६७मध्ये गव्हर्नर फ्रियर निवृत्त झाला. २८ मे १८८४ रोजी त्याचे निधन झाले. फ्लोरा फाउंटन शिल्पही जडणघडणीचा एक भाग म्हणून बांधण्यात आले होते. परंतु त्यामागचा इतिहास थोडा वेगळा आहे. या कल्पक, वैभवशाली व आगळ्यावेगळ्या स्मारकाचा, स्थापत्य कलासौंदर्य दृष्टिकोनातून घेतलेला आढावा...

पुनरुज्जीवित फ्लोरा फाउंटन

तत्कालीन फोर्ट तटबंदीस तीन प्रवेशद्वारे होती. पहिले बझार गेट व दुसरे लॉयन गेट. तिसरे प्रवेशद्वार फोर्टमधील सेंट थॉमस चर्चसमोर असल्यामुळे त्यास चर्चगेट असे नाव रूढ झाले होते. तेच नाव नव्या उपनगरी रेल्वे स्थानकास देण्यात आले. हा एक प्रकारे मुंबई स्थापत्य इतिहासाचा सन्मान केल्यासारखे आहे! योजनेनुसार तटबंदीसहित प्रवेशद्वारेही पाडण्यात आली. नवीन आराखड्यानुसार प्रत्येक प्रवेशद्वारासमोर मोठ्या आकारातील वाहतूक बेट तयार झाले. या विकासामुळे पाच वर्षांत मुंबईला नवा चेहरा मिळाला. महाराष्ट्र सरकारच्या पुराभिलेख खात्याने सर बार्टल फ्रियरच्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रांचे जतन केले आहे. गव्हर्नरने केलेल्या कार्याचे मोल बंदिस्तावस्थेत ठेवण्याऐवजी मुंबईकरांच्या चिरंतन स्मृतीत राहावे, म्हणून तत्कालीन चर्चसमोरील प्रवेशद्वाराच्या मूळ जागेवर त्याच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यात निर्णय घेण्यात आला.

चर्चगेट (चित्र आणि फोटो)

पुरातन तटबंदीचे अवशेष

वास्तविक पाहता हे शिल्प राणीच्या बागेत (व्हिक्टोरिया गार्डन) ठेवण्यासाठी बनवले होते. परंतु फ्लोरा फाउंटन या नावानेच त्याचे उद्घाटन करण्यात आले! नवीन आराखड्यानुसार तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनस, चर्चगेट व अपोलो गेटसमोरील रस्त्यावर मोठ्या आकारातील जंक्शन्स तयार झाली. या सर्व जंक्शन्सवर चारपेक्षा अधिक रस्ते आहेत, इंग्लंडमध्ये अशा जागेस ‘सर्कल’ म्हणण्याचा प्रघात आहे. त्यानुसार व्हीटी, फ्लोरा फाउंटन, काळा घोडा व वेलिंग्टन फाउंटन, हॉर्निमन सर्कल इत्यादी नावांनीच ही स्थाने आजही ओळखली जातात. १९६०नंतर स्थानिक प्रशासनाने या जंक्शन्सना एतद्देशीय मान्यवरांची नावे देऊन त्यापुढे ‘चौक’ असे नामकरण केले आहे. तरीही या जागा जुन्या नावांनीच ओळखल्या जातात. यावरून जनसामन्यांच्या मनातील पुरातन मुंबई स्थापत्यविषयक स्थान ओळख किती घट्ट आहे हे दिसून येते. ब्रिटिश काळापासून ते आजतागायत दक्षिण मुंबईतील ही जंक्शन्स मुंबईची शक्तिस्थाने बनून राहिली आहेत. त्यापैकी फ्लोरा फाउंटनचे अनन्यसाधारण महत्त्व आजही टिकून आहे!



सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व श्यामाप्रसाद मुखर्जी चौकाच्या मध्यावरील फ्लोरा फाउंटन जंक्शन सर्वांत मोठे आहे. इतर जंक्शन्सपेक्षा या जंक्शनला अधिक लोक भेट देतात व त्याची सामावून घेण्याची क्षमतादेखील अधिक आहे. या दूरदृष्टीपणाचे संपूर्ण श्रेय गव्हर्नर फ्रियर व तत्कालीन वास्तुविशारदांना द्यावे लागेल! या परिसरात सन १९६०पर्यंत अप्रतिम संगमरवरी पुतळ्यांची रेलचेल होती. त्यापैकी नगर चौकातील राणी व्हिक्टोरिया व एस्प्लेनेड जंक्शनवरील काळा घोडा व आसपासचे पुतळे वेगवेगळ्या कारणांनी हटवले गेले. ज्या गव्हर्नरने पाच वर्षांत प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर मुंबईला दर्जेदार शहर बनवले, त्याचे नावही फाउंटनला दिले गेले नाही. ज्या एतद्देशीयांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अवघे जीवन खर्ची घातले, ते समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व प्रो. गोपाळ कृष्ण गोखले यांचे पुतळे ओव्हल व क्रॉस मैदानाला लागून उभे केले आहेत. या पुतळ्यांची दखल ना वर्तमान स्थानिक प्रशासनाकडून घेतली जाते, ना नागरिकांकडून! हे पुरातन मुंबई स्थापत्य इतिहासाचे दुर्दैव आहे! 



फ्लोरा ही रोमन देवता. या फाउंटनच्या शिखरावरील फ्लोरा देवतेमुळे ‘फ्लोरा फाउंटन’ हे नाव देण्यात आले. फाउंटन रचनेत रोमन देवता, डॉल्फिन मासे, शिंपल्याच्या आकारातील अलंकृत कुंड, मध्यवर्ती गोलाकार कारंजे व मानवी आकारातील विलोभनीय शिल्पांचा अनोखा संगम असलेले हे मुंबईतील एकमेव वास्तुशिल्प असावे! कारंज्यातील पाण्याचा प्रवाह रोमन देवतेच्या पायाशी अल्लडपणे रेंगाळणाऱ्या लोभस डॉल्फिन मत्स्याच्या मुखातून सुरू होतो व शिंपल्यातून तिसऱ्या टप्प्यातील कुंडावरील सिंहमुखातून गोलाकार हौदामध्ये पाण्याचे निर्गमन होते. या क्रमवारीत पाण्याचा भिंतीला स्पर्शही होणार नाही याची काळजी घेतली आहे. तसेच शिल्पाच्या मध्यभागातील चक्राकार कारंजेही लक्ष वेधून घेते. कारंज्यासाठीचा पाणीसाठा नऊ इंच रुंदीच्या बिड नलिकेस जोडलेल्या प्रेशर व्हॉल्व्हद्वारे रिसायकल केला जातो, हेदेखील या कारंज्याचे वैशिष्ट्य आहे. त्याखालील चौरस आकारातील भिंतीत चारही दिशांना बसक्या आकारातील शोभिवंत कमानी आहेत. या कमानीच्या वरचा भाग विस्तृत भुजा, पाने व फुलांच्या नाजूक आकारातील वेलबुट्ट्यांनी अलंकृत केला आहे. चारही कोपऱ्यांत संगमरवरी दगडात बनवलेली मानवी आकारातील महिला शिल्पे अलंकृत केलेल्या अर्धगोलाकार खोबणीत चपखलपणे बसवली आहेत. त्यात विदेशी व भारतीय धाटणीतील महिला शिल्पे दोन्ही देशांतील पौराणिक कथांवर आधारित आहेत, हे वेशभूषेतून दिसून येते. 

पौराणिक कथेवर आधारित महिलेचा पुतळा

भारतीय वेशभूषेतील महिलेचे शिल्पएकूण रचनेतील मानवी शिल्पे, समुद्री डॉल्फिन, शिंपले, कमानीवरील पाने-फुले व पाण्याचा वापर या नैसर्गिक घटकांमुळे शिल्पात जिवंतपणा आला आहे! कला-सौंदर्याने फुलवलेल्या, मन प्रसन्न करणाऱ्या वास्तुशिल्पास बसवलेले सुरक्षाकवचही एकूण सौंदर्यात भर घालते. या गोलाकार लोखंडी सुरक्षाकवचात ठराविक अंतरावरील काळसर रंगातील कळी-पुष्पाकार व उभ्या दंडावरील सोनेरी गोलाकार शिल्पाच्या भारदस्ततेत भर घालतात! सुरक्षाकवच आकारास पूरक ठरणारे इतर आकारही एकूण शिल्पसौंदर्य खुलवण्यास पुष्टी देणारे आहेत, हे विशेष. युरोपमधील शहरात कल्पनेशी सुसंगत मोहक आकार व रंगसंगती असलेल्या कल्पक शिल्पांची रेलचेल जागोजागी आढळते. जणू काही ही शहरे शिल्पासाठीच वसवली आहेत की काय असा प्रश्न पडतो! 

फ्लोरा फाउंटन शिल्प पोर्टलँड दगड व मार्बलमध्ये घडवले आहे. त्याचा मूळ पोत व रंग आहे तसा ठेवला आहे हे विशेष. मध्यंतरीच्या काळात, शिल्पाचा रंग व पोत याचा विचार न करता पांढऱ्या ऑइलपेंटमध्ये संपूर्ण शिल्प रंगवण्याचा हास्यास्पद प्रकार स्थानिक प्रशासनाने केला होता. तो प्रयोग म्हणजे शिल्प-कला-सौंदर्यकल्पना मोडीत काढण्याचाच प्रकार होता! मुंबई शहराचे सौंदर्य व पर्यावरण जपण्यासाठी धडपडणाऱ्या सुज्ञ व कला-संवेदनशील शहरवासीयांचे हे दुर्दैव आहे!



मूळ फ्लोरा फाउंटन रिचर्ड नॉर्मन शॉ या वास्तुविशारदाने निओ गॉथिक आणि निओ क्लासिकल शैलीत आरेखित केले आहे. शैली विदेशी असूनही ते भारतीय वळणाचे दिसावे याचा पुरेपूर प्रयत्न दिसून येतो. कारंज्यातील मानवी शिल्पे कला-संवेदनशील स्कॉटिश शिल्पकार जेम्स फोर्सिथने घडवली आहेत. या शिल्पामुळे स्थानिक दगडात बांधलेल्या वैविध्यपूर्ण शैलीतील इमारतींचे कलासौंदर्य वाढले आहे. हे प्रथम ग्रेडचा दर्जाप्राप्त झालेले कारंजे ‘दी अॅग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ने बांधले आहे. यासाठी झालेल्या एकूण ४७ हजार रुपये खर्चापैकी २० हजार रुपयांचा निधी कर्सेटजी फर्दुनजी पारेख या धनाढ्य व्यापाऱ्याने दिला होता. या संदर्भातील कोरीव नोंद शिल्पतळपट्टीवर आढळते. तत्कालीन ब्रिटिश राजवटीत बांधलेले हे शिल्प सर्वांत महागडे असल्याची नोंद आहे! 

फ्लोरा देवतेच्या पायाखालील डॉल्फिन

मूळ फ्लोरा फाउंटनचे उद्घाटन दिनांक १८ नोव्हेंबर १८६९ रोजी झाले होते. सन २०१७ सालापासून तांत्रिक कारणामुळे कारंजे बंद होते. तब्बल दोन वर्षांनंतर दिनांक २४ जानेवारी २०१९ रोजी फ्लोरा फाउंटन पुनश्च सुरू झाले. कारंज्याच्या पुनरुज्जीवनाचे काम संवर्धन वास्तुविशारद विकास दिलावरी यांनी केले आहे. ज्या तांत्रिक कारणामुळे कारंजे बंद ठेवले होते, ते उद्दिष्ट पूर्णपणे साध्य झाले की नाही, हे सांगणे कठीण आहे. कारण, कारंज्यात समाविष्ट असलेल्या सर्व मुखांतून पाणी समान दाबात वाहत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे भिंती ओल्या व काळपटही दिसतात. दुसरी खटकणारी बाब म्हणजे सुरक्षा. लोखंडी चौरस पाइप व संगमरवरी दगड सांधेजोड कमी दर्जाची झाली आहे, ही बाब दृष्टीआड करणे अवघड आहे. तिसरी व तेवढीच महत्त्वपूर्ण बाब म्हणजे कारंज्याच्या भोवताली बसवलेली ओबडधोबड दगडी फरसबंदी. फ्लोरा फाउंटनसारखे कला-सौंदर्यपूर्ण शिल्प न्याहाळताना दर्शकांना व विशेषकरून टोकदार सँडल वापरणाऱ्या महिलांना फरसबंदीवरून काळजीपूर्वक चालावे लागते. ते व्यवस्थित करणे फारसे कठीण नाही! पुरातन शैलीतील कास्ट आयर्न विद्युत खांबाचा वापर पुरातन शिल्पाशी मिळताजुळता आहे; पण ते ज्या तळखड्यावर बसवले आहेत ते विजोड वाटतात! शिल्पाच्या आवारात अल्पकाळ बसण्यासाठी केलेली व्यवस्था नेटकी, पण आधुनिक वळणाची आहे. 



फ्लोरा फाउंटन जंक्शनचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे काळानुसार वाहनतळाचा सतत बदलत जाणारा आकार! सन १८६४पासून आजतागायत अनेक वेळा यात बदल केले गेले आहेत. जुन्या छायाचित्रात ते दिसून येते. असे असूनही फ्लोरा फाउंटन परिसरातील सौंदर्यात किंचितसाही फरक जाणवत नाही हेच या कला-सौंदर्याने नटलेल्या शक्तिस्थानाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे! आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या इमारतींचा वारसा कला-संवेदनशीलतेने जपला, तरच पुढील पिढी या शाश्वत आनंदाचा हिस्सा बनून राहील! अनेक वर्षांपासून मुंबईतील वारसा स्थळे शहरव्यवस्था व सौंदर्याचा अविभाज्य घटक बनून राहिली आहेत. तत्कालीन वास्तुरचनाकारांनी या परिसरातील जडणघडणीत तडजोडीचा पर्याय न स्वीकारता, वास्तू उपयुक्तता व कला-सौंदर्याच्या निकषांवर इमारतींचे आरेखन केले होते, हे त्या त्या इमारतींच्या वैशिष्ट्यातून समजून येते. 

गव्हर्नर फ्रियरने सन १८६२मध्ये घेतलेल्या निर्णयामुळे तटबंदी व तीन प्रवेशद्वारांचे अस्तित्वच नाहीसे झाले. या संदर्भातील बातमी ऐकून निराश झालेले ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे तत्कालीन संपादक स्टेनली रोड म्हणतात, ‘त्या प्रसंगाच्या आठवणीने मन व्यथित होते. ज्या पुरातन स्थापत्याशी आपण जोडले गेलो होतो, ती शृंखलाच आम्ही तोडून टाकली आहे. अरे! निदान एक दरवाजा तरी आठवण म्हणून जतन करायला हवा होता!’ एका ब्रिटिश संपादकाने भारतातील पुरातन ठेव्यासंबंधी व्यक्त केलेली संवेदनशीलता खूपच बोलकी आहे! तत्कालीन तटबंदीचे काही अवशेष आजही सेंट जॉर्ज हॉस्पिटलशेजारील पी. डीमेलो रोडवर शिल्लक आहेत; पण प्रवेशद्वार आठवणीच्या रूपाने फ्लोरा फाउंटनसारखी वैभवशाली वास्तू आठवण म्हणून एका वेगळ्या स्वरूपात उभी आहे.

रात्रीचे दृश्यअशा अनेक वास्तूंचे योग्य जतन-संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. वर्तमान मुंबईतील विकास व गतिमान जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस शहरसौंदर्य व पुरातन ठेव्यात घट होत चालली आहे. याच सुंदर परिसराची साक्ष असलेले एस्प्लेनेड कोर्ट अति दुर्लक्ष केल्यामुळे पाडले जाणार आहे! तेव्हा, मुंबईतील पुरातन वास्तूंचे जतन, संवर्धन लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी केंद्र, राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने विशेष राखीव निधीची व्यवस्था करण्याची गरज आहे, जेणेकरून पुरातन सौंदर्याचे दाखले अधिक काळ टिकून राहतील. खऱ्या अर्थाने वैभवशाली पुरातन इमारतीच मुंबईची शान आहेत आणि हीच या शहराची खरी ओळख टिकून राहायला हवी!

ई-मेल : चंद्रशेखर बुरांडे - fifthwall123@gmail.com

(ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी मुंबईतील अनेक इमारतींची वास्तुकलासौंदर्याच्या दृष्टिकोनातून ओळख करून देणारे लेख लिहिले आहेत. ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZHECB
Similar Posts
मुंबईतील आर्ट डेको वास्तुशैलीचे सौंदर्य मुंबईतील ओव्हल मैदान आणि मरीन ड्राइव्ह या भागांत ब्रिटिश काळात आर्ट डेको शैलीत निवासी संकुले बांधण्यात आली. या इमारती बांधताना दीर्घ काळ टिकण्याचा हेतू तर होताच; पण त्यांची रचना करताना सौंदर्यदृष्टी वापरून त्या दीर्घ काळ स्मरणातही राहतील, या पद्धतीने बांधण्यात आल्या आहेत. या शैलीबद्दल विस्तृत माहिती
रायगड किल्ल्याचा स्थापत्य-इतिहास : अभ्यासाचा एक महत्त्वाचा पैलू ‘पुरातन स्थापत्य इतिहास संशोधनात अनेक साधनांचा समावेश असतो. उपलब्ध साधने बारकाईने तपासण्याची गरज असते. म्हणून ऐतिहासिक सत्य वास्तुशास्त्र कसोटीवर तपासून मगच वाचक/दर्शकांसमोर यायला हवे.’ ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे आणि इतिहास अभ्यासक डॉ. सचिन पोवार यांनी रायगड किल्ल्याच्या स्थापत्य-इतिहास संकलनाबद्दल
मुंबईच्या कल्याणासाठी झटलेले नाना शंकरशेट! मध्ययुगीन कालखंडातील संत व विचारवंतांप्रमाणेच ब्रिटिशकालीन राजवटीत, समाजकल्याणाचा विशाल दृष्टिकोन ठेवून अनेक धनिक समाजसेवी मुंबईतील जनतेच्या कल्याणासाठी पुढे सरसावले होते. जगन्नाथ शंकरशेट ऊर्फ ‘नाना’ त्यांपैकी एक होत. नानांना मुंबईचे आद्य शिल्पकार, रेल्वेचे जनक, स्त्री-शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते असेही संबोधित केले जाते
कलेचा वारसा जपणारा काळा घोडा महोत्सव दक्षिण मुंबईतील कलेचा वारसा जपण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या काळा घोडा महोत्सवाचे यंदाचे विसावे वर्ष आहे. कला, संगीत व स्थापत्य कलेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे कार्य हा महोत्सव करतो आहे. यंदाचा महोत्सव दोन फेब्रुवारीला सुरू झाला असून, १० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ‘काळा घोडा’ या नावामागचे रहस्य,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language